परवाच (12 जून 2025) अहमदाबाद मध्ये घडलेल्या विमान दुर्घटनेच्या  भयानक बातमीने अक्षरशः मन सुन्न झाले. वास्तविक पाहता विमान खरंतर अहमदाबादहून लंडनला चालले होते परंतु कितीतरी लोकांसाठी अवघ्या  काही मिनिटांपूर्वी  हा प्रवास वास्तवातून स्वप्नांच्या दुनियेत जाण्यासारखाच असेल... 
कुणी आपल्या माणसांना भेटायला चाललं होतं, कुणी आपल्या संपूर्ण कुटुंबासहित कायमच तिथेच स्थायिक होऊन आपलं नवीन आयुष्य सुरू करायला निघालं होतं, कुणी भावी आयुष्याची, सुखी संसाराची स्वप्न रंगवत होतं.. एक ना अनेक... प्रत्येकाची वेगळी गोष्ट... प्रत्येकाची वेगळी कथा... पण या कथांचा प्रारंभ होण्याअगोदरच  क्षणार्धात  इतक्या दुर्दैवीपणे या सर्व कथा कायमच्या मिटून जाव्यात... ??? 
प्रत्येकाने उराशी कवटाळून ठेवलेली सुख-दुःख, विचार, वेदना, भावी आयुष्याचा विचार करून ठरवलेल्या  योजना, नियोजने, भविष्यातील
महत्त्वकांक्षा, इच्छा, आकांक्षा,भूतकाळातील आठवणी, वर्तमानातील आनंद... प्रत्येकाने मनी बाळगलेली स्वप्न.. अगदी काही क्षणात त्या 15 महिन्याच्या चिमुकल्या जीवासह कायमच्या काळाच्या पडद्याआड जाव्यात...हे खरोखरच खूप वेदनादायी आहे... या दुर्घटनेतील म्हणा किंवा पहेलगाम हल्ल्यातील म्हणा किंवा मुंब्रा येथे घडलेल्या ट्रेनच्या दुर्घटनेमध्ये जीव गमावलेल्या दुर्घटनेतील म्हणा.. या निष्पाप मृत  लोकांची जागा कुठल्याच गोष्टीने भरून काढता येणारी नाही... एकापाठोपाठ एक घडलेल्या या भयानक घटनांनी अक्षरक्ष : प्रत्येक संवेदनशील भारतीय नागरिकांची मनं सुन्न झाली आहेत.. या सर्व दुर्घटनेमध्ये आपला जीव गमावलेल्या आपल्या भगिनी आणि बांधवांना  श्रद्धांजली🙏🏼
 
देव तारी त्याला कोण मारी या उक्तीची प्रचिती अर्थात या दुर्घटनेतून बचावलेले विश्वास कुमार रमेश या व्यक्तीकडे बघून पुन्हा एकदा आली आणि मनाला कुठेतरी हायसे वाटले.
 
हीच अहमदाबाद टू लंडनची फ्लाईट पकडण्यासाठी भूमी चव्हाण नावाची मुलगी सुद्धा निघाली होती, परंतु अहमदाबाद मध्ये असलेल्या ट्रॅफिकमुळे तिला तिची ही फ्लाईट वेळेवर पकडता आली नाही.. त्याचप्रमाणे एक आजोबा देखील या फ्लाईट मध्ये येणार होते परंतु त्यांचे या फ्लाईटचे तिकीट अचानक कॅन्सल झाले..
 वरील दोन बातम्या वाचल्यानंतर खरोखर मला Trust The Timings या उक्तीची आठवण आली. आपण मनात ठरवल्याप्रमाणे एखाद्या नियोजित स्थळी वेळेवर तिथे पोहोचण्यासाठी  निघतो खरं, पण तेथे आपण जातो...? की आपल्याला नेलं जातं....? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे...


  बऱ्याच वेळेस आपण घरातून नियोजित कामे उरकण्यासाठी अगदी वेळेवर निघत असतो, परंतु त्या प्रवासात नको तितक्या,नको त्यावेळी अडचणी येऊन आपल्याला आणखीन उशीर होत असतो आणि त्यामुळे आपली चिडचिड होत असते.. आणि मग आपली घाई सुरू होते... त्या घाईमध्ये आपल्याला आपल्या वर्तमान क्षणाचे जराही भान राहिलेले नसते,समोर फक्त दिवसभरात करावयाची कामे डोळ्यापुढे नाचत असतात आणि त्याच विचारांच्या धुंदीत आपण मिळेल ती गाडी,मिळेल ती रिक्षा, मिळेल ती बस पकडून अक्षरक्ष: घाईघाईने नियोजित स्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो.. कुणी मस्टर गाठायच्या प्रयत्नात... तर कुणी डील क्रॅक करण्याचा प्रयत्नत, कुणाला शाळेत,कोणाला कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचण्याची घाई... तर संध्याकाळी प्रत्येकाला आपल्या घरट्यात परतण्याची ओढ.. मान्य आहे सकाळची ही घाई आणि संध्याकाळची ही ओढ या दोन्ही गोष्टी जगण्याच्या गरजेतूनच जन्माला आलेल्या आहेत.. परंतु या दोन्ही गोष्टी पुढे आपल्या स्वतःचा जीव हा इतका शुल्लक झाला आहे का... की तो आपण कसाही धोक्यात टाकावा...?
 देवाने दिलेले हे इतके मौल्यवान आयुष्य...आपण ट्रेनची गर्दी, चालत्या ट्रेनमध्ये धावत चढणे, आपली वाहनने अगदी वेगाने चालवणे किंवा जीवघेण्या ट्रॅफिक मध्ये नको त्याला ओव्हरटेक करणे, वाहने चालवत असताना मान वाकडी करून मोबाईलवर बोलणे ...या अशा गोष्टींमध्ये स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालून किती सहजपणे पुढील गोष्टी गृहीत पकडतो... वर उल्लेख केलेल्या भूमी चव्हाण ला किंवा त्या आजोबांना ही आपली फ्लाईट मिस झाल्याचे दुःख त्या क्षणाला खूपच वाटले असेल यात शंका नाही, त्यांनी ती फ्लाईट मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्नही केला असेल,परंतु ज्या क्षणी त्यांना या दुर्घटनेची माहिती मिळाली असेल त्या क्षणी त्यांच्या बाबतीत जे झाले ते किती बरे झाले याची जाणीव त्यांना आयुष्यभर आठवणीत राहील... 


 ...जीवनात असे कितीतरी वेळा होते की, आपल्याला जे हवे असते ते त्यावेळी मिळत नाही आणि आपल्या बाजूच्याला मात्र ती गोष्ट अगदी सहजपणे मिळून जाते..त्यावेळेस आपल्याला कधी कधी मनात खूप प्रश्न निर्माण होतात आणि प्रसंगी वाईट देखील वाटते. इतकं प्रामाणिकपणे काम करून... इतकी मेहनत करून मला कशाचीच पोचपावती का मिळत नाही..? इतर लोकांच्या बाबतीत मात्र काहीही न करता, अगदी प्रसंगी लबाडी करून सुद्धा  किती सहजपणे सगळ्या गोष्टी चांगल्या घडत जातात ...माझ्याच बाबतीत नेहमी असे का होते...? असे प्रश्न आपल्या डोक्यात भेडसावू लागतात... आणि हे असे वाटणे अगदी स्वाभाविक आणि साहजिक आहे.. प्रसंगी अशावेळी आपल्या संयम देखील खचू लागतो.. 

परंतु आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते...ती विशिष्ट वेळ जेव्हा येते ना...तेव्हाच त्या गोष्टी घडतात आणि खरंतर तेव्हाच त्या गोष्टी घडलेल्या योग्यही असतात. फक्त गरज असते ती म्हणजे, ती योग्य वेळ येईपर्यंत संयम राखून, मनाला हेतूपूर्वक शांत ठेवून आपले कर्म करत राहण्याची.. आपला तोल डळमळीत न होऊ देता.. आणि जगामधल्या चांगुलपणावरचा आपला विश्वास ढळू न देता..  प्रयत्न करत राहणे.. प्रयत्नांना यश मिळाले तर उत्तमच आहे, परंतु जर प्रयत्नांना यश मिळाले नाही तर ही वेळ योग्य नाही. योग्य वेळ आल्यानंतर माझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल ही भावना आपण  ठेवली पाहिजे .
 अनेक प्रयत्न करून सुद्धा जेव्हा गोष्टी आपल्या हातात बाहेर जातात..तेव्हा त्या सर्व गोष्टी त्या एका अज्ञात शक्तीवर सोपवाव्यात.. पुढील मार्गाला लागावे आणि योग्य वेळेची वाट बघावी . 

शेवटी काय वेळ प्रत्येकाची येतेच... 

मग ती चांगली असो वा वाईट..

Trust the Timings..😊




Share