प्रत्येक पालकांना आपल्या मुलांनी प्रगती करावी, आयुष्यात पुढे जावं,यशस्वी व्हावं असं वाटत असतं. त्या अनुषंगाने प्रत्येक पालक आपल्या मुलांना प्रोत्साहन देत असतात.. प्रेरणा देत असतात.. जेणेकरून त्यांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास बळ मिळावं आणि त्याच प्रोत्साहन आणि प्रेरणेचा एक मोठा भाग असतो तो म्हणजे आपल्या पाल्यांची स्तुती करणे.आपल्या मुलांनी जर एखादी चांगली गोष्ट केली उदाहरणार्थ परीक्षेत चांगले गुण मिळविले, स्पर्धेत चांगला नंबर मिळवला,तर तर पालक आपल्या पाल्यांची सहाजिकच नैसर्गिक रित्या स्तुती करतात. स्तुती करताना मात्र आपण जे शब्द वापरतो त्या शब्दांच्या बाबतीत आपण सावधगिरीने जर काही शब्दांची निवड केली आणि त्या शब्दांचा आवर्जून वापर स्तुती करताना जर केला तर मुलांच्या मानसिकतेवर किती मोठा परिणाम होऊ शकतो हे सांगणारा आजचा हा लेखन प्रपंच...
केरॉल झेक नावाचे एक संशोधक. त्या संशोधकांनी 'स्तुतीचा मुलांच्या मनावर होणारा परिणाम' या विषयावर एक जवळजवळ दहा वर्ष संशोधन केले. त्या संशोधनांची जे काही निष्कर्ष त्यांनी काढले ते निष्कर्ष अक्षरशः स्तंभित करणारे होते. केरॉल झेक यांनी केलेल्या अनेक प्रयोगांपैकी हा एक प्रयोग त्यांनी पाचव्या इयत्तेतील जवळजवळ 400 विद्यार्थ्यांवर हा प्रयोग केला. त्यांनी त्या 400 विद्यार्थ्यांना एक चाचणी सोडविण्यास दिली . चाचणी सोडविल्यानंतर त्या 400 विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी केली . चाचणी दोन्ही गटांनी उत्तमरीत्या सोडवली होती. परंतु पहिल्या गटाला मात्र तुम्ही खूप हुशार आहात तुम्ही खूप स्मार्ट आहात तुम्हाला अवघड असं काहीच नाही अशा रीतीने स्तुती करून त्यांच्या या चाचणीच्या यशाचे कौतुक केले गेले. आणि दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही खूप परिश्रम घेतले, तुम्ही प्रचंड मेहनती आहात,तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला काहीही अशक्य नाही, तुमच्या मेहनतीचे चीज झाले.. अशा शब्दात त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. . पुढे दुसऱ्या फेरीमध्ये या दोन्ही गटांसमोर चाचणी च्या संदर्भात एक पर्याय दिला गेला त्या दोन्ही गटांना जे पर्याय दिले होते त्यापैकी एक पर्याय असा होता की तुम्हाला अतिशय सोपी अशी चाचणी सोडविण्यास दिली जाईल आणि दुसरा पर्याय होता की तुम्हाला कठीण चाचणी सोडविण्यास दिली जाईल. तुम्हाला या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा आहे. गट क्रमांक एक ज्या गटाला हुशार आणि स्मार्ट असे म्हणून गौरवण्यात आले होते...त्या गटातील बहुतांश मुलांनी सोपी चाचणी सोडवण्यास संमती दर्शवली आणि गट क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांना ज्यांना मेहनती असे म्हणून गौरविण्यात आले होते त्या गटातील मुलांनी मात्र कठीण चाचणी सोडवण्यास पसंती दर्शविली. दोन्ही गटांना त्यांना हे पर्याय निवडण्याच्या पाठीमागचे कारण विचारले असता गट क्रमांक एक म्हणजेच हुशार आणि स्मार्ट म्हणविल्या जाणाऱ्या मुलांचे असे म्हणणे होते की, आमची इमेज बाहेर हुशार स्मार्ट अशी झालेली आहे. जर आमच्या पुढ्यात कठीण चाचणी आली आणि आम्ही जर ती चाचणी सोडवू शकलो नाही तर आम्ही जी आमची इमेज तयार केली आहे तिला कुठेतरी तडा जाऊ शकतो आणि त्यानंतर आम्हाला हुशार किंवा स्मार्ट म्हणून गौरविण्यात येणार नाही, म्हणून आम्ही मुद्दामून सोपीच चाचणी निवडली. जेणेकरून आम्हाला जी बिरूद मिळालेली आहेत... ती कायम तशीच राहतील. गट क्रमांक दोन ला कठीण चाचणी का निवडली असे विचारण्यास आले असता, त्यांच्याकडून असे उत्तर आले की आम्ही मेहनती आणि परिश्रमी मुलं आहोत. आमच्या मेहनतीने आम्ही काहीही गोष्टी प्राप्त करून घेऊ शकतो . सोपी चाचणी तर आम्ही सोडवणारच यावर आमचा विश्वास आहे. परंतु आम्ही कठीण चाचणी किती चांगल्या प्रकारे सोडवू शकतो हे आमचे आम्हालाच आजमावयाचे आहे, कारण आम्हाला आमच्या मेहनतीवर,आमच्या मनगटाच्या बळावर विश्वास आहे.
आता तिसरी फेरी चालू झाली तिसऱ्या फेरीमध्ये या दोन्ही गटांना एक अतिशय अवघड चाचणी दिली गेली त्या अवघड चाचणीमध्ये दोन्ही गटातील बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. पहिल्या गटाला त्यांच्या या अपयशाबद्दल विचारले गेले असता,पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी खूप नाराज होऊन आम्ही हुशार नाही, आम्ही तितके स्मार्ट नाही, आम्हाला काही येतच नाही. ही चाचणी खरच खूप अवघड होती आणि आम्ही हुशार नसल्यामुळे आम्हाला ती सोडवताच आली नाही. असे म्हणून अतिशय निराश उद्गार त्यांनी काढले. गट क्रमांक दोन ला हीच विचारणा केली असता त्यांचे म्हणणे असे होते की चाचणी तर खरोखर अवघडच होती, परंतु आम्हाला असे वाटते की आमची मेहनत थोडी कमी पडली. आम्ही जर अधिक मेहनत केली असती, अधिक परिश्रम घेतले असते, तर आम्ही ही चाचणी नक्की सोडवू शकलो असतो. पुढच्या वेळेला आम्ही अधिक परिश्रम अधिक मेहनत घेऊन येऊ आणि पुढच्या वेळेस हीच चाचणी आम्ही यशस्वीरित्या सोडवून दाखवू...असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या बोलण्यामध्ये एक आशावादीपणा होता. त्याच्यात निराशावाद हा कुठेही दिसला नाही.
सदर उदाहरणांती आपल्याला असे दिसून येते,की ज्या मुलांना हुशार स्मार्ट अशी बिरूद लावली गेली होती, अशी लेबल्स चिकटवले गेले होते,त्या लेबलला कुठेही तडा जाऊ नये,त्यांची इमेज कुठेही खराब होऊ नये याची काळजी त्या विद्यार्थ्यांनी सतत घेतली होती आणि त्या काळजीपोटीच त्यांना आयुष्यातील नवीन नवीन आव्हाने पेलण्याची भीती वाटू लागली होती. त्यांना स्वतःवर लावलेले लेबल जपण्यातच धन्यता वाटत होती. आणि ते लेबल्स जर पुसले गेले तर आपण कुठेही तोंड दाखवायला लायक राहणार नाही अशी त्यांची ठाम समजून झाली होती. त्यामुळे ते स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरच जायला बघत नव्हते. परंतु गट क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांना मात्र त्यांच्या हुशारीबरोबरच त्यांच्या परिश्रम आणि मेहनतीला जास्त महत्व दिले गेले असल्यामुळे त्यांचा हुशारीपेक्षा त्यांच्या परिश्रमावर त्यांच्या मनगटाच्या बळावर अधिकाधिक विश्वास दृढ होऊ लागला होता आणि त्यांचा परिश्रम आणि मेहनत या दोन गोष्टींवरच्या या विश्वासामुळेच आयुष्यातील कितीतरी कठीण आव्हान पेलण्याची ताकद त्यांनी स्वतःमध्ये अनायसे निर्माण केली होती.
मंडळी,आपण सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहजपणे आपल्या चिमुरड्यांची स्तुती करताना ओघाओघात हुशार,स्मार्ट, तुला काहीच अवघड नाही असे शब्द वापरतो.. असे शब्द वापरण्यात काहीही चूक नाही, परंतु या शब्दांबरोबरच पुढच्या वेळेस आपल्या पाल्याची स्तुती करताना त्यात त्यांनी केलेल्या मेहनतीला त्यांनी केलेल्या परिश्रमाला गौरविण्यास अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा... हुशारी आणि स्मार्टनेस ह्याच्याबरोबर परिश्रमाची, मेहनतीची, मनगटाच्या बळावर असलेल्या विश्वासाची जोड जर असेल तरच आपले मूल आयुष्यात येणाऱ्या कठीण प्रसंगांना, आयुष्यात येणाऱ्या आव्हानात्मक प्रसंगांना तोंड देण्यास सक्षम ठरतं आणि आपल्याला जर हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करावयाचा असेल,तर आजपासूनच आपल्या मुलांची स्तुती करताना हुशार आणि स्मार्ट या शब्दांबरोबरच त्यांची मेहनत..त्यांचे परिश्रम..त्यांच्या मनगटात असलेले बळ... या शब्दांना वापरण्यास अजिबात विसरू नका.
धन्यवाद 🙏🏼
Share




No comments:
Post a Comment