"मम्माला करपलेले पदार्थ जरा जास्त आवडतात... "

मुलाच्या तोंडून हे वाक्य ऐकलं आणि मी थोडी चमकलेच... कारण थोडे करपलेले खाद्यपदार्थ आणि मी ...आमचं हे एक सिक्रेट रिलेशनशिप आहे असं मला आतापर्यंत वाटत होतं परंतु खरं पाहता मुलं किती सहजतेने आपल्या कृतींची नोंद त्यांच्या मनात करून ठेवत असतात याची काल पुन्हा एकदा प्रचिती आली... 

मात्र मुलाचं हे वाक्य रात्रभर माझ्या मनात रेंगाळत होतं...वाटलं 

का बरं आपल्याला थोडे करपलेले पदार्थ जास्त आवडतात...?

त्याचं एक कारण होतं...पदार्थाचा थोडा करपलेला भाग मला अधून-मधून खायला आवडतो ..म्हणजे थोडा करपलेला पदार्थ आणि मग योग्य रीतीने शिजलेला  पदार्थ यांचं कॉम्बिनेशन मला भन्नाट आवडतं..अगदी लहानपणापासूनच..पण नंतर मनाने लगेच दुसरा प्रश्न केला .. 

असं का ..? 
 वाटलं ...मुळात करपलेले म्हणजे काय. ...?

उष्णतेची धग थोडी जास्त लागलेले...त्यात थोडे अधिक होरपळलेले.... 

हे असेच थोडे करपलेले पदार्थ चाखले आणि त्यानंतर मग योग्य प्रमाणात शिजलेला तोच पदार्थ खाल्ला की मला त्या पदार्थाची लज्जत अधिक वाढल्या सारखी वाटायची आणि वाटते...पुन्हा सवयीनुसार थोडं करपलेलं खाल्लं की त्याची अशी एक वेगळी चव जाणवते...अगदी ती किंचित कडवट असली तरीही...कारण या नंतर पुन्हा तोच पदार्थ, उत्तम चव देणार आहे हे माहीत असायचं ना मला. ..म्हणून असेल कदाचित.... 

मित्रांनो ...आपल्या आयुष्याचं देखील असंच आहे...

दुःखानं होरपळल्या नंतर मिळालेल्या आनंदाची चव न्यारीच...

सतत भीती दडपण चिंता ताण तणाव यांची बंधनं गळून पडल्यावर मिळालेल्या स्वातंत्र्याची लज्जत काही औरच...

सतत उन्हाचे चटके सोसल्यामुळे सावल्यांचीही झळ लागते अशांच्या आयुष्यात येणाऱ्या मायेच्या पखरणीला मोलच नसतं... 

जीवनाचं हे चक्र असच असतं सुखानंतर दुःख ...दुःखा नंतर 
सुख हे चालूच राहतं...

आनंदाची...स्वातंत्र्याची चव खुशाल चाखावी आणि ती चाखायलाच हवी...

परंतु त्याच वेळेला मनात  एक खूणगाठ घट्ट बांधून ठेवावी आणि ह्या मनाला एकदाच बजावून ठेवावं 

"की बरं का..यानंतर एखादी कडवट चव जरी चघळावी  लागली...(मग ती दीर्घ काळासाठी असो नाहीतर लघु काळासाठी असो) तेव्हा सुद्धा मला अशीच खंबीर साथ दे..."कडवट चवी नंतर चांगली चव आपल्याला चघळायला मिळणारच आहे हा विश्वास कायम दृढ ठेव .."

काही कडू आणि काही गोड अशा अनुभवांनी भरलेला आणि भारलेला आपला जीवन प्रवास प्रत्येकाला , रुचकर लागू दे. . प्रत्येकाचा हा प्रवास सुसह्य असुदे, आणि होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना .. 

धन्यवाद🙏


-प्राची पाटील

 

Share